गण गण गणात बोते...! च्या गजरात भक्तिमय झाले शहर, विविध धार्मिक कार्यक्रमांनी श्री गजानन महाराज प्रकट दिन साजरा

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवानिमित्त श्री गजानन महाराज मंदिरात आज मोठ्या उत्साहात श्री गजानन महाराज महाराज प्रकटदिन साजरा करण्यात आला. यावेळी गारखेडा, गजानन महाराज मंदिरात सकाळपासून मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. यावेळी गजानन महाराज की जय, गण गण गणात बोते असा मंत्र जप करण्यात आला. यावेळी गजानन महाराज यांच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाहून निघाले.

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या १४८ व्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्त आज (दि.८) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे चार वाजता ब्रह्मवृंदांच्या हस्ते श्रीं च्या अमृताभिषेक पूजनाने सोहळ्याची सुरुवात होईल. प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने विश्वस्त मंडळाच्यावतीने भाविक भक्तांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आली. मंदिर आणि मंदिराचा परिसर विद्यूत रोषणाईने उजळला आहे. तर प्रकटदिनी ५५० हून अधिक सेवेकरी सेवा देत आहेत. सदगुरु श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिन सोहळ्याच्या निमित्ताने श्री गजानन महाराज ( शेगांव) मंदिर विश्वस्त मंडळ गारखेडा यांच्यावतीने गेल्या १ फेब्रुवारीपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा वाचन, श्री गजानन विजय ग्रंथ सामुदायिक पारायण, हरिकीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रांचे आयोजन करण्यात आले होते. तर आज या सोहळ्याचा मुख्य दिवस आहे. प्रकट दिनानिमित्त पहाटे ४ वाजता मंदिरात ब्रह्मवृंदांच्या हस्ते व भक्तांच्या उपस्थितीमध्ये श्रीं चा अमृताभिषेक करण्यात आला. यानंतर सकाळी ७ वाजता श्रीं ची आरती केली जाईल. मंदिर पहाटे चार वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत भक्तांना दर्शनसाठी खुले राहणार आहे. भक्तांना श्रीं चे शांततेत दर्शन  घेता यावे. 

यासाठी मंदिरालगतच्या कडा मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला आहे. मंडपाजवळच पादत्राणे ठेवण्याचे स्टॅण्ड व वैद्यकीय सहायता कक्ष तयार करण्यात आले आहेत. एकाच वेळी हजारो भक्त थांबू शकतील एवढी लांब दर्शनबारी तयार करण्यात आली. दर्शनबारीमध्येच भक्तांना पिण्याच्या पाण्याची, तसेच स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे. गाभारा सजवण्यात आला आहे. अशी माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण वक्ते यांनी दिली.

भक्तिमय झाला गजानन महाराज मंदिर परिसर

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज प्रकट दिन महोत्सवानिमित्त श्री गजानन महाराज मंदिरात आज मोठ्या उत्साहात श्री गजानन महाराज महाराज प्रकटदिन साजरा करण्यात येत आहेत. त्यात गजानन महाराज मंदिर परिसरात आज पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठया संख्येने रांगा लावल्या. यावेळी गजानन महाराज की जय अशा जयघोषात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाहून निघाला.